सरनाईकांच्या पर्यायी मार्गाला नगरसेवकांचा विरोध
ठाणे : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अंतर्गत रिंग मेट्रोच्या सुचविलेल्या पर्यायी मार्गाला शिवसेना शिंदे गटातीलच स्थानिक नगरसेवकांनी विरोध करत मानवी साखळी आंदोलन केले. त्यामुळे सरनाईक विरुद्ध स्थानिक नगरसेवक असा सामना रंगला आहे.
लोकमान्यनगर येथून शिवाईनगर, उपवनमार्गे जाणाऱ्या मूळ मार्गाला परिवहन मंत्री आमदार प्रताप सरनाईक यांनी विरोध करत पर्यायी मार्गाची सूचना केली आहे. मात्र, त्यांच्याच पक्षातील स्थानिक नगरसेवकांनी या भूमिकेला विरोध केला आहे. ‘रिंग मेट्रो हवीच हवी, मात्र मूळ मार्गावरच हवी’ अशी भूमिका घेत नगरसेवक दिलीप बारटक्के आणि कांचन चिंदरकर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी मानवी साखळी करून शक्तिप्रदर्शन केले. त्यामुळे रिंग मेट्रोच्या मार्गावरून परिवहन मंत्री विरुद्ध स्थानिक नगरसेवक असा सामना रंगला असून, या निमित्ताने शिंदेसेनेतील अंतर्गत मतभेदही चव्हाट्यावर आले आहेत.
ठाणे अंतर्गत रिंग मेट्रोच्या मंजूर मूळ मार्गात बदल करण्याच्या प्रस्तावाला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. लोकमान्य टीएमटी डेपो, आई माता मंदिर, कोरस रोड, वर्तकनगर नाका आणि शास्त्रीनगरमार्गे पर्यायी मार्ग प्रस्तावित करण्यात आल्याने त्याविरोधात गुरुवारी सायंकाळी आई माताजी चौक येथे मानवी साखळी करून निदर्शने करण्यात आली. या आंदोलनामुळे रिंग मेट्रोच्या मार्गावरून शिंदेसेनेतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. मूळ मार्ग बदलल्यास नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल, असा दावा नागरिकांना यावेळी केला.
म्हाडा वसाहत, दोस्ती, वेदांत कॉम्प्लेक्स, कोरस टॉवर, रुणवाल प्लाझा, अनिझरा, तमन्ना, अमित, भैरी भवानी तसेच डवलेनगर परिसरातील विविध सोसायट्या आणि गृहसंकुलांमधील नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनी मूळ मार्ग कायम ठेवण्याची मागणी केली आहे.
मार्ग बदलल्यास वृक्षतोड, रस्त्याखालून जाणाऱ्या सेवा वाहिन्या आणि विस्थापनाचा प्रश्न निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. नव्या मार्गामुळे हजारो नागरिक बाधित होण्याची शक्यता असून, वाहतूक कोंडीमध्येही भर पडू शकते, असा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. त्यामुळे रिंग मेट्रोचा मार्ग बदलण्याऐवजी आधी मंजूर करण्यात आलेल्या मूळ मार्गावरच प्रकल्प पुढे न्यावा, अशी मागणी करण्यात आली.
या प्रकरणाची वस्तुस्थिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे मांडण्यात आली असून, त्यांनीही या विषयाची गांभीर्याने नोंद घेतल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे आता प्रशासन तसेच राज्य सरकार या मार्गाबाबत कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, रिंग मेट्रोच्या मार्गावरून सत्ताधारी पक्षातीलच दोन वेगवेगळ्या भूमिका समोर आल्याने ठाण्यातील राजकीय वातावरण तापले आहे.